|
|

विदेशी गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र देशाचे महाद्वार - उद्योगमंत्री मंगळवार, ९ मार्च, २०१०
व्यापार, उद्योगातील गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असलेला महाराष्ट्र हा विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारताचे महाद्वार असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री राजेंद्र दर्डा यांनी केले.
चेक प्रजासत्ताकचे उद्योग व व्यापार मंत्री टॉमस हुनेर आणि चेक प्रजासत्ताकच्या कौन्सिल जनरल श्रीमती द्रोडाकोव्हा यांनी मंगळवारी उद्योगमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली, त्यावेळी श्री. दर्डा बोलत होते. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव ए.एम. खान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. शिवाजी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी निर्मलकुमार देशमुख आदी उपस्थित होते.
श्री. दर्डा म्हणाले की, महाराष्ट्रात मुंबई-पुणे या शहरापेक्षा ग्रामीण भागात गुंतवणूक करू पाहणार्या उद्योजकांना व्हॅट, उत्पन्न कर, वीज बील यामध्ये मोठ्या प्रमाणात सवलती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उद्योग उभारण्यासाठी जमिनीही अल्प दरात उपलब्ध आहेत. बायोटेक्नॉलॉजी, विशेष आर्थिक क्षेत्र, विशाल प्रकल्प आदी बाबतच्या धोरणानुसार देशी-विदेशी गुंतवणूकदारांनी सामंजस्य़ करार केल्यानंतर त्यांची अंमलबजावणीही लवकर करण्यात येते. त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ, पायाभूत सुविधा राज्यात उपलब्ध असून महाराष्ट्र आणि चेक प्रजासत्ताकमधील कंपन्या यांच्या दरम्यान होणार्या करारांचे नेहमीच स्वागत करण्यात येईल.
राज्यात माहिती तंत्रज्ञान आणि औषध निर्माण या क्षेत्रातील उद्योगांतही मोठी प्रगती झाली आहे. पुणे, हिंजवडी माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे केंद्र बनले आहे. औरंगाबाद येथे मोठ्या प्रमाणावर उद्योग केंद्रीत झाले आहेत, असे सांगून या दोन्ही शहरांना भेट देण्याचे आमंत्रण श्री. दर्डा यांनी श्री. हुनेर यांना दिले.
श्री. हुनेर म्हणाले की, भारतासह महाराष्ट्र आणि चेक प्रजासत्तक यांच्या दरम्यान उद्योग आणि व्यापार या क्षेत्रात संबंध वृध्दिंगत व्हावेत. चेक प्रजासत्ताक भारतात ऊर्जा क्षेत्रात, विशेषत: अणु ऊर्जा यामध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे.
श्री. खान यांनी महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रात कशी प्रगती होत आहे, राज्य गुंतवणुकीसाठी कसे योग्य आहे तसेच विशेष आर्थिक क्षेत्र यांची माहिती दिली. श्री. के. शिवाजी यांनी एमआयडीसी उद्योजकांना पुरवित असलेल्या सोयी आणि सुविधांची माहिती दिली.
'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
|
|